Thursday, May 21, 2009

यादें, यादें, यादें.... और हमारे चौबे जी

हे टायटल वाचल्यावर तुमच्या डोक्याचा भुगा झाला तर नवल नाही. तुमच्या मातापित्यांनी तुमचे संगोपन कसे केले त्याला अनुसरून तुम्ही एखादी शिवी हासडाल पण ही भानगड काय आहे ते समजून घेण्याची उर्मी प्रबळ झाल्यामुळे तुम्ही लेख वाचायला सुरूवात कराल. आता पहिल्याच प्यारेग्राफमध्ये तुम्हाला याचा अर्थ सांगितला तर फुड मजा काय राहीली वो सायेब? तर टायटलमध्येच यादें म्हटल्यावर आम्ही स्वतःला स्मरणरंजनाचे (म्हणजे नॉष्टाल्जिया, बर का!) लायसन काढून दिले आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच. आणि खरे सांगायचे तर लायसनचीही गरज नाही. भंकस करायला लायसन लागते असे कुणी सांगितले आहे?

परवा आयपीयलची म्याच बघताना मन भूतकाळात गेले. आमच्या लहानपणी टिव्ही वगैरेंचा दिमाख नव्हता. त्यामुळे क्रिकेटशी संबंध मुख्यतः रेडियोमधून यायचा. त्यातही रणजी सामना असेल तर त्याची मराठीतून कॉमेंटरी म्हणजे धावते समालोचन.

साठ्ये : नमस्कार; आकाशवाणी पुणे () केंद्रावर आपले स्वागत आहे. मुंबई विरुद्ध दिल्ली यांच्यात खेळल्या जाणार्या रणजी सामन्याचे दुसर्या दिवसाचे धावते समालोचन. पहिल्या दिवशी मुंबईने दमदार फलंदाजी करून आपली बाजू भक्कम केली आहे. तुम्हाला काय वाटते, कुलकर्णी?

कुलकर्णी : अं अं अं...झ्याकफिरदुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र् (कुलकर्णी नेहेमी नाजुक वेळेस तपकिरीचा बार भरतात!)

साठ्ये : असो. तर कुलकर्णींच्या ह्या विशेष प्रतिक्रियेनंतर सामन्याकडे वळू या. सकाळच्या या कोवळ्या उन्हात फलंदाज ब्याटी हातात घेऊन तयार. मला आठवतय, १९६७ साली चंदू बोर्डे खेळत असताना असेच कोवळे उन पडले होते. तुम्हाला आठवतय का लेले?

लेले (माइकवर हात ठेवून) : त्यो फोया छ्यायया थ्याया म्थामम्मा!

साठ्ये (मा.हा.ठे.) : काय?

लेले (मा.हा.ठे.) (तंबाखू गिळून टाकत) : अहो तो पोर्‍या जायच्या आत चहा सांगा त्याला. नंतर यायचा नाही परत!

मध्येच प्रक्षेपण थांबते.
"असा उदास का दिसतो आहेस, रामय्या?"
"काय करू, पावसाळा तोंडावर आला, पण घराचे छप्पर अजून तयार नाही"
रामय्याची वेळ तुमच्यावर येऊ देवू नका. वापरा लक्ष्मी सिमेंट.

साठ्ये : मुंबई संघाचे फलंदाज गावसकर सूर्याकडे बघतायत, गोलंदाजाकडे बघतायत, प्रेक्षकांकडे बघतायत, ब्याट हातात घेतायत, घुमवतायत, तिच्या वजनाचा अंदाज घेतायत. गोलंदाज अमरनाथ चेंडूवर लकाकी आणतायत, चेंडू घासतायत, पुसतायत, घासतायत, पुसतायत, घासतायत, पुसतायत, घासतायत, पुसतायत. पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा, मिडल आणि ऑफवर, गावसकर यांच्या मनात आलं होत की फटका मारावा पण अखेरच्या क्षणी त्यांनी निर्णय बदललेला आहे आणि चेंडू यष्टीरक्षकाकडे.

अशी बाल-बाय-बाल कामेंटरी ऐकत आमचा दिवस जात असे. इथे बालचा संबंध केसाशी लावून एक पीजे उकळण्याचा मोह आम्ही कठोर मनाने टाळला आहे []. आमच्या या अपूर्व त्यागाची इतिहास नोंद घेईलच, सध्या तुम्ही घ्या म्हणजे झालं.

[] लोकशाहीत अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे महत्त्व मनमुराद कुठेही पीजे मारायला मिळाले की लक्षात येते. हेच एखाद्या सुलतानाच्या दरबारात झाले असते तर?

"कोण आहे रे तिकडे? याला अंधारकोठडीत डांबून महिनाभर कुमार सानूच्या आवाजात 'मेरे नयना सावन भादो' ऐकवा."

"सुलतान, माफी! मला हत्तीच्या पायाखाली द्या, कडेलोट करा पण सुमार कानू नको."

"खामोश! नामाकूल, बेअदब, बेतकल्लुफ, बेमुरव्वत, बेसफा, बेचाफा, बेदाणा! तख्त-ए-सलतनत-ए-ताजिरात-ए-
आलमपनाह--हिंदुस्तान च्या समोर पीजे मारण्याची गुस्ताखी? या अपराधाला मुआफी नाही."

इतके मोठे वाक्य एका दमात बोलल्यामुळे
तख्त-ए-सलतनत-ए-ताजिरात-ए- आलमपनाह--हिंदुस्तान धापा टाकू लागतात.

कैद्याच्या किंकाळ्यांचे आवाज हळूहळू क्षीण होत जातात. महालातून दिसणार्या प्रदूषणविरहित सूर्यास्ताकडे बघताना, खारेदाणे तोंडात टाकत सुलतान पुढच्या गुस्ताखीला कुठला गायक निवडावा या विचारात गढून जातात. तेवढ्यात बेगमसाहिबा प्रवेश करतात. त्यांच्या अचानक एंट्रीवर दचकून सुलतानांचे खारेदाणे ग्यालरीतून खाली सांडतात. दुसरे कुणी असते तर सहा महिने हिमेश रेशमिया पण बेगमसाहिबांच्या समोर सुलतान गरीब बैलात फुरियर ट्रान्सफॉर्म होत असत... अरेच्च्या, ही तळटीप आहे होय! आम्ही चुकुन आमच्या 'कमिंग जावई' (दरवेळी स्त्रियांनाच समान हक्क का म्हणून?) ऐतिहासिक नाटकातच घुसलो.

अशी मध्येच तळटीप घुसल्याने आमच्या विचारप्रक्रियेत खंड पडला आहे. तेव्हा पुढील भेटीपर्यंत रामराम, सीतासीता, रावणरावण इ.

अरेहो, तो टायटलचा घोळ निस्तरायचा राहिलाच की. तर त्यावेळी धर्मयुग नावाचे एक चांगले मासिक येत असे. त्यात एक सदर असायचे, "यादें, यादें, यादें..." आणि एकदा यात कुणीतरी कुठल्यातरी चौबेजीं वर लेख लिहीला होता. फारशी मासिकं येत नसत त्यामुळे तोच अंक पुन्हापुन्हा वाचून काढायचा. अशा प्रक्रियेत ही दोन्ही टायटल डोक्यात फिट्ट झाली.

यादें, यादें, यादें.... और हमारे चौबे जी


14 comments:

Bhagyashree said...

lol.. te khamosh!namakul .. chya pudhchi line ashakya ahe! :D :D
tu vinodi khup mast lihitos !! :D

Saee said...

YOu know what..you are really good at nonsense. :)
There are two zones of PJs. One zone is when the PJ is slightly les than a GJ (good joke) so you feel frustrated. But your PJs are so P that it is hard not to laugh because it makes no sense at all. :D
When I read "bedana" I burst into a giggle in the lab and the chinese guy who works (24X7) on the HPLC thinks I am just sucking up a lot of scholarship here. :(

Bhalchandra Pujari said...

> बेगमसाहिबांच्या समोर सुलतान गरीब बैलात फुरियर ट्रान्सफॉर्म होत असत

:D:D:D!!!

Ruminations and Musings said...

अप्रतिम.. मन भूतकाळात गेलेच. कुमार सानू.. मस्तच. जमला आहे अगदी..

कोहम said...

aur chaube ji...wah wah...sumar kanuitaka kumar sanucha achook varNan me kuthehi aikala navhata...ani bedanahi khasach..

Dhananjay said...

too good!

Raj said...

भाग्यश्री, सई, भालचंद्र, नीलांबरी, कोहम, धनंजय

प्रतिसादांबद्दल अनेक आभार. रणरणत्या वाळवंटाप्रमाणे पसरलेल्या या ब्लॉगविश्वामध्ये आपले स्नेहपूर्ण प्रतिसाद थंडगार पाण्याचा शिडकावाच जणू करून जातात. की राहुल रॉयला फिल्मफेअरच मिळाले, की सदाशिव पेठेत चहाबरोबर पोह्यांची बशीच समोर आली, की पुण्यातील दुकानदार तुमच्याकडे बघून हसला, की पीएमटीच्या कंडक्टरने सुट्टे दिले इ. इ.

हा प्रतिसादही भंकसच आहे, जास्त सीरीयसली घेऊ नये. खूप बरे वाटले असे म्हणायचे होते.

Monsieur K said...

>> पुढील भेटीपर्यंत रामराम, सीतासीता, रावणरावण इ.

awesome!! absolutely hilarious :)))

Saee said...

Okay Rajpant...
ata time up zalay. Navin blog chi inspiration kashi pathwu? :)

vaibhav said...

Height of PJ s.

टुकारमोस्ट पी. जे. साठी त्यांनी इग्नोवेल द्यायला हवं आता.

And you are a very strong contestant for the same, I must say.

That was irksome good!

(आता तुम्ही पी. जे. चं कुराण निवडलंत, म्हणून तुमची स्तुती(!) पण त्याच फुटपट्टीने केली आहे.)

;)

Bhagyashree said...

लिही की अरे ! कोणीच लिहीत नाहीये .. :(

Raj said...

मस्य के,
अनेक आभार. :)

सई
इन्स्पिरेशन कशीही पाठवलीस तरी चालेल, पाठव म्हणजे झालं :)

वैभव
हा आमच्या ट्यालेंटचा सन्मान आहे असे आम्ही समजतो.

तेवढ इग्नोबलच बघा. :)

भाग्यश्री
सईने इन्स्पिरेशन पाठवली की लगेच लिहीतो. :)

Saee said...

Tu asa wachakanna tangawnara lekhak ka ahes? I know for sure ki tuzya ayukshyat (amchya kamwalya bai asa boltat) baryach sundar parya waigaire ahet. Tu muddam lihit nais. Karan manatlya manat tula mahiti ahe ki tu khup sahi lihitos. Manatlya manat kay, janatlya janat suddha mahiti ahe.
Mug ata fakta tu ka lihit nais yacha karan sang. You can choose from the following options.
1) Tu sansanit premat padlays
2) Tu Rakhi chya swayamwar madhun disqualify zalas mhanun dukkhi ahes
3) Tuzya gharchyancha tuzya lekhanala wirodh ahe
4) Tu bhaw khatoys

Mazya mate uttar 4 sahi jawab ahe.
Aso. Mala jam kantala alay. Ani tuzya page war me balach diwsatun 3-4da yete. :(
lawkar lihi.

Saee

Raj said...

काय सईबाई, तुम्हाला इन्स्पिरेशन पाठवा म्हटलं तर तुमची गाडी पर्‍यांच्या राज्यात गेली. पर्‍या काय, राखी काय! :प

बाय द वे, मी भाव किंवा बहीण खात नाहिये, खरच काही सुचत नाहिये. आणि बळच लिहीलं तर ते इतक बोअरिंग असत की मलाच परत वाचवत नाही.

कदाचित राखी इफेक्टच असावा. तुला मी डिसक्वालिफाय झाल्याच कुणी सांगितल? मला ते सीक्रेट ठेवायच होत :प
त्याच्यातून सावरायला मला दोन-तीन महिने तरी लागतील. तोपर्यंत काही लिहायला गेलं की समोर राखीचा चेहेरा येतो. मग काय करणार?

असो. जोक्स अपार्ट, प्रशंसेबद्दल अनेक आभार. लिहीण्याचा प्रयत्न जरूर करेन.
प्रॉमिस! कोलगेट! क्लोज-अप! :ड