लिहीणे कधीकधी कॅथार्टिक असते असे म्हणतात. सॉमरसेट मॉमने Of Human Bondage च्या प्रस्तावनेत म्हटलय, "या पुस्तकाने माझ्यासाठी जे करायला हवे होते ते केले. हे पुस्तक जेव्हा जगासमोर आले (तो युद्धाचा काळ होता आणि जगाला एका काल्पनिक पात्राकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:च्या समस्या आणि क्लेश अधिक महत्त्वाचे वाटले असतील) तेव्हा माझी माझ्या दु:खापासून आणि त्रासदायक कटू आठवणींपासून मुक्तता झाली." मॉमच्या तुलनेत आपण मर्त्य माणसे. पण लिहील्यानंतर हलके वाटले तर त्यामागे कॅथार्टिक प्रक्रिया असावी का?
अशीच एक शनिवार संध्याकाळ. आठवड्याच्या बाजारात मांडलेले चीज, वाईन, हॅम, मधाच्या बाटल्या. कोपर्यावरच्या कॅफेबाहेर व्हाईट वाईनचा आस्वाद घेत, उन खात बसलेले इटालियन आजोबा. एक धावणारा, एक रडणारा आणि कुशीत झोपलेला या सर्वांना सांभाळत वाईनची खरेदी करणारी मरिया. छोट्या अँम्ब्युलन्सजवळ खाट टाकून लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणारा फिलिपो. अचानक सर्व पॉझमध्ये जातात आणि एम्पीथ्री प्लेअरवर गाणे सुरू होते
कहूं किससे मै के क्या है, शब-ए-गम बुरी बला है
मुझे क्या बुरा था मरना, अगर एक बार होता
दोनशे वर्षांपूर्वीच्या एका मनस्वी कवीचे शब्द, एका पूर्णपणे वेगळ्याच वातावरणात ऐकताना बर्गमनच्या चित्रपटांसारखे सगळे 'सरिअल' वाटायला लागते. ग़ालिबची तीव्र वेदना देश, काल, भाषा, संस्कृती सर्वांची अंतरे ओलांडून मनाला भिडते. अशा ओळी वाचल्या की शब्दांमागे असलेले प्रचंड सामर्थ्य लक्षात येते. मग वाटतं, आपण शब्द किती निष्काळजीपणे वापरतो. आपल्या भावना, विचार, मनातली घालमेल, अपयशाचे दु:ख, अपेक्षाभंगाची वेदना हे सगळं व्यक्त करण्यासाठी शब्दांइतके चांगले माध्यम कुठे सापडणार?
लिहीण्याचा संबंध कुठेतरी अनुभूतीशी असावा. पण हे जाणिवेत आणायचे म्हटले तर अशक्य वाटते. रोज आपण किती अनुभवांमधून जात असतो. त्यातले काही मनावर कळेल न कळेल असा ठसा उमटवून जातात. बहुतेक वेळा हा परिणाम इतका सूक्ष्म असतो की नेमका काय परिणाम झालाय हे कळतही नाही. मग जुने लिखाण वाचताना कधीकधी एखादा शब्द, एखादे वाक्य यांची आणि त्या अनुभूतीची संगती लागते आणि हा सबंध लक्षात येतो. आणि हे व्यक्त होण्याची प्रक्रियाही भन्नाट असते. बरेचदा एखाद्या कवितेतून वेगळाच प्रसंग चित्रीत होतो पण थोडे खोदून बघितले तर त्यामागची खरी प्रेरणा लक्षात येते.
अनुभूतींचे जग तरी किती विलक्षण!. रात्रीच्या दोन वाजता शांततेत गाणार्या मार्क नॉफलरचा ’ग्रफ’ आवाज, एप्रिलमधल्या सुरेख सकाळी इटलीच्या रस्त्यांवरून भटकताना वार्याच्या मंद झुळूकीमुळे क्षणभरच जाणवलेला एका सुवर्णकेशीच्या शनेलचा गंध, उत्साह आणि चैतन्य यांनी भरभरून वाहणारा झाकिरभाईंचा परफॉर्मन्स, सिस्टीन चॅपेल प्रत्यक्ष बघताना मायकेल अँजेलोच्या दिव्यत्वाची पटलेली साक्ष, एखाद्या निष्णात सर्जनने सफाईने सुरी चालवावी तसा सचिनने मॅकग्राला मारलेला पुल शॉट , गॉडफादरमध्ये सोलाझ्झोचा खून करण्याच्या काही क्षण आधी केवळ डोळ्यांमधून पानभर डायलॉक बोलणार्या पचिनोच्या अभिनयाचा अविस्मरणीय आविष्कार, हे सगळे अनुभव मनात रूजत रहातात. पण सकाळी अनुभव घेतला की दुपारी लगेच लिहायला बसू असेही होत नाही. बरेचदा अनुभव अंतर्मनात मुरून एका वेगळ्याच रूपात बाहेर पडतो. हे रूप कुठले असेल ते आधी कळणे अशक्य. मग काहीतरी वेगळेच लिहीताना अचानक तो क्षण समोर येतो आणि आपली छोटीशी खूण ठेवून जातो. एखाद्या गोष्टीला आपला खास असा 'ट्च' देऊन जातो. याच्या उलट प्रवासही काही वेळेस होतो. एखाद्या कवीची एखादी ओळ वाचताना विसरून गेलेला लहानपणीचा एखादा क्षण लख्ख आठवतो. तो क्षण, ती भावना यांचे वर्णन करता येणे अशक्य.
दोन एक वर्षांपूर्वी मनोगतावर एक ’टू डू लिस्ट’ केली होती , उरलेल्या आयुष्यात काय काय करायला आवडेल त्याची. त्यात एक आयटेम होता - एक पुस्तक लिहायचे आहे. लिस्टमधले अजून तरी काही बदलावेसे वाटलेले नाही.
एवढं सगळं लिहील्यानंतर मूळ प्रश्नाचे उत्तर मिळाले की नाही ठाउक नाही. पण मला वाटते उत्तर मिळण्यापेक्षा ते शोधण्यातच जास्त मजा आहे.
माझा खो a sane man ला. :-)
11 comments:
hech baraobar vatata.
वा वा हॅम्लेटपंत. मस्त.
जीए म्हणतात, ’कागद हा सर्वात चांगला श्रोता आणि सिगारेट ही सर्वात चांगली मैत्रीण असते. प्रेयसीचा झुरळाप्रमाणे चालणारा लडिवाळपणा आणि बायकोची त्रासदायक भुणभुण त्यांच्याकडे नाही. मनाला जे वाटेल ते कागदाला सांगावे. बिचारा आपले म्हणणे शांतपणे ऐकून घेतो. ’
Agdi patala tu mhatlela. Ek experience...jo tumchyavar chhap sodun jato...ani tumhala saglyana sangavasa vatata...kadachit aiknaryala/vachnaryala tevdha prakarshane nahi toh experience pan shrota tya experiencechya jawal paas nakkich pochto. Shrota jitka jwala pochel lekhan titkach utkrushta. Ani gammat mhanje Lekhak toh anubahv punha ekda jagun jata ya saglya process madhe.
पटलं. लेखन म्हणजे आजवर साठलेल्या अनुभवांचा फ्रुशिओ* (लाक्षणिक अर्थाने) अशी व्याख्या करावीशी वाटत होती, ती बरीचशी खरी असली तरी कदाचित परिपूर्ण होणार नाही. तुझ्या टू-डू लिस्टमध्ये पुस्तक लिहिणे योगायोगाने अखेरीस आहे. त्यावरून म्हणावंसं वाटतं की, जर त्याआधी लिहिलेल्या गोष्टी करण्याचे (किंवा त्या तोडीचे अनुभव घेण्याचे) मनसुबे पूर्ण झाले तर पुस्तक आपोआपच आकाराला येईल.
[* पाने चाळताना होणारा आवाज]
शोधण्यातच मजा आहे! खरंय, अगदी अगदी खरंय.
'लिहावंसं का वाटतं' हा तसा क्वालिफाईड पत्रकारी ठरू शकेलसा आचरट प्रश्न. पण तुम्ही सगळे इतकं गंभीरपणे, इतकं खोल लिहिताय की मला अशी भीती का बरं वाटली होती, असा प्रश्न मला आता पडतो आहे.
मनापासून आभार.
Thnx re..lihito 1-2 divsaat! :)
@सिनेमा पारादिसो
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@आजानुकर्ण
मस्त कोट! आवडले. अनेक धन्यवाद!
@आनंद
सहमत आहे. म्हणूनच कदाचित असे म्हणतात की ऍबस्ट्रॅक्ट पेंटींगमध्ये तुम्ही जो काढाल तो अर्थ असतो. आणि बरेचदा चित्रकाराला जे म्हणायचे असते ते आणि तुमचे इंटप्रिटेशन यात बराच फरक असू शकतो. पण तुम्हाला चित्र बघितल्यावर काय जाणवते ते महत्त्वाचे.
@नंदन
अनेक धन्यवाद. खरेतर लिस्टमधल्या एक-दोन गोष्टी जमल्या तरी खूप असे वाटते. पुस्तक फारच लांबची गोष्ट आहे. पण लिस्ट करायला काय हरकत आहे असे वाटले. पुस्तक लिस्टमध्ये शेवटी आहे हे लक्षात आले नव्हते. :-)
@मेघना
उलट तुझे आभार विषय सुरू केल्याबद्दल. प्रश्न स्टँडर्ड आहे, पण उत्तरे इंटरेस्टींग असू शकतात.
@a sane man
ओके. जेव्हा जमेल तेव्हा!
राज - सही लिहिलंयस!
ट्युलीपने हा खो-खो चांगल्याच वरच्या लेव्हलवर नेऊन ठेवलाय आणि तुम्ही लोक जसजसे लिहिताय तसतसा माझा अचंबा वगैरे वाढतच चाललाय. मी अगदीच trivial कारणांनी लिहितो असं वाटायला लागलंय - but then, it is what it is!
(जी.एं. च्या भाषेत - अल मख्तूब! मख्तूब!!) (संदर्भ - काजळमाया).
सचिनचा पुल शॉट आणि पचिनोची नजर - हे संदर्भ विशेष आवडले, आणि ऑफकोर्स - "मुझे क्या बुरा था मरना, अगर एक बार होता"....
आजानुकर्ण - जी.एं. नी हे वाक्य म्हटल्याचं (माझ्यातरी) ऐकिवात नव्हतं - but it's quite possible. पण दुसरी गोष्ट अशी कि (हे तू ही मान्य करशील) कि - वाक्य "टाकणं" वेगळं आणि वाक्य "जगणं" वेगळं -
जी.ए. हे वाक्य जगुन गेले - major थोर माणुस होता तो!
राज - Keep it up.
atta comments vachtana ekaeki lakshaat aala ki aadhichya comment madhe he post aawaDalyacha lihilach nahi mi :(....mhaNun aata varatimagun punha comment...mast lihilayas...ni tuze sandarbha paN zakas aahet..nehmisarkhech! :)
@अभिजित
तू trivial कारणांनी लिहितोस असे तुझी पोस्ट वाचून नक्कीच वाटत नाही. उलट ती वाचल्यानंतर बरेच गंभीर प्रश्न पडतात. त्यामागची कारणे तुला trivial वाटोत, पण पोस्ट nontrivial असतात हे नक्की.
क्रिकेट आणि चित्रपट हे दोन अत्यंत आवडीचे विषय असल्याने त्यातले प्रसंग आठवले. एखाद्याला चित्रकला भावत असेल तर पिकासो पाहून असेच वाटत असणार. आणि ग़ालिब वाचल्यानंतर परिणाम होणार नाही अशी व्यक्ती सापडणे कठीण.
प्रोत्साहन आणि प्रशंसेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@a sane man
लेख आवडला हे आवर्जून सांगितल्याबद्दल अनेक धन्यवाद. :-)
संदर्भ जसे भावले तसे आहेत, आत्ताच लक्षात आले की पचिनोची चित्रफित युट्युबवरून काढून टाकली आहे. :-(
chhaan lekh
Post a Comment