Wednesday, June 25, 2008

I want my MTV...

भगवान जब भी देता है, छप्पर फाडके देता है. काही कलाकारांकडे पाहिले की याची खात्री पटते. अमिताभने नुसत्या आवाजाच्या जोरावर समोरच्याला खाऊन टाकले असते. त्याच्या जोडीला सशक्त अभिनय आणि संमोहित करणारी पर्सनॅलिटी असल्यावर तो आज जिथे आहे त्याबद्दल विशेष आश्चर्य वाटत नाही. थोडासा खरखरीत वाटेल असा 'ग्रफ' आवाज, रोज घडणार्‍या साध्या गोष्टींना शब्दात गुंफून सुंदर कविता लिहीण्याची हातोटी, अत्युत्कृष्ट म्युझिकल सेन्स आणि गिटारवादनात जगात २७ वा क्रमांक हे सर्व असल्यावर मार्क नॉफलर इतका लोकप्रिय झाला याबद्दलही आश्चर्य वाटत नाही. मार्कचा क्रमांक २७ आहे म्हणजे त्या पातळीवरही किती पातळ्या आहेत हे पाहून थक्क व्हायला होते. बाकी आम्ही जिथे आहोत तिथून सगळेच 'गॉड लेव्हल' भासतात. (मार्क गिटार स्ट्रायकर न वापरता बोटाने वाजवतो. त्यातही त्याची गिटार धरण्याची पध्द्त चुकीची आहे (आणि तिचे अनुकरण करू नका) असे तो स्वतःच म्हणतो.)

खरे तर डायर स्ट्रेट्स हा पॉपमध्ये मायकेल जॅक्सन, मॅडोना किंवा रॉकमध्ये लेड झॅपलिन, यू२ यांच्यासारखा सर्वमान्य लोकप्रिय बँड नाही. एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या बँडचे आज सिमीत पण डाय-हार्ड चाहते आहेत. एका ऍन्थ्रॉपॉलॉजिस्टच्या टीमने एक नवीन डायनॉसॉर सापडल्यावर त्याला मार्कचे नाव दिले : Masiakasaurus Knopfleri, कारण उत्खनन करत असताना डायर स्ट्रेट्सचे संगीत असले तर त्यांना रोचक सांगाडे मिळत असत.

मार्क नेहेमीचा गुडी-गुडी प्रेमगीते गाणारा चॉकलेट गायक नाही. किंबहुना डायर स्ट्रेट्सच्या कारकिर्दीत बोटावर मोजण्याइतकी प्रेमगीते असतील. आणि यात जाणवतो तो नाते संपल्यानंतरही प्रेयसीला विसरू न शकणारा, काहीसा ऑब्सेसिव्ह प्रियकर. मग When it comes to you मध्ये दिसते ती नाते तुटत असतानाची तीव्र वेदना.

If we cant get along, we oughtta be apart
And I'm wondering where'd you get that cold, cold heart
Set me free - sign my release
I'm tired of being the villain of the piece
You been givin me a bad time
Tell me what'd I do
How come I always get a hard time
Honey when it comes to you
Sayin things, that you didn't have to
How come I always get a hard time
Honey when it comes to you

आणि गालिबच्या गझलांप्रमाणे यातली प्रेयसी निष्ठुर, स्वार्थी असते. मग Romeo and Juliet मध्ये रोमिओ ज्युलिएटला म्हणतो, "Where you can fall for chains of silver, you can fall for chains of gold." नाही म्हणायला So far away एक सुंदर विरहगीत आहे, पण तो अपवादच.

मार्कला वेगवेगळी गाणी कशी सुचली याच्या कथा मनोरंजक आहेत. तो (बहुधा अमेरिकेत) एका इलेक्ट्रॉनिक्स ऍप्लायन्सच्या दुकानात गेला होता. दुकानातल्या सर्व टीव्हींवर एमटीव्हीमधले कुठलेतरी गाणे चालू होते. ते पाहून तिथला सेल्समन वैतागला होता. "आजकाल कुणी येतं, एमटीव्हीवर गातं आणि खोर्‍याने पैसे ओढतं. पोरी त्यांच्या मागे लागतात. आणि आम्ही इथे बसलोय, फ्रिज पोचवा, मायक्रोवेव्ह इन्स्टॉल करा. छ्या, ह्याला काही अर्थ आहे का?" मार्कने पाच मिनिटे त्याचे बोलणे ऐकले आणि नंतर ती वाक्ये एका नॅपकिनवर उतरवून घेतली. मग स्टींगसोबत Money for Nothing लिहीलं. हे गाणे डायर स्ट्रेट्सचे सर्वाधिक लोकप्रिय गाणे ठरले, शिवाय याला ग्रॅमी ऍवॉर्डही मिळाले. या गाण्याच्या सुरूवातीचा गिटार पीस अप्रतिम आहे.

एकदा मित्रांमध्ये गप्पा चालल्या असताना एकजण म्हणाला, "तू घरी कधी सापडतच नाहीस. जेव्हा फोन करावा तेव्हा आन्सरिंग मशीन. Calling you is like calling Elvis." तेवढा क्लू पुरेसा होता. यावरून मार्कने Calling Elvis लिहीले. (यातला Heartbreak Hotel आणि Love me Tender चा संदर्भ छान आहे.) त्याचे वडील एकदा युद्धाविषयी बोलताना म्हणाले, "Finally all soldiers are brothers in arms." त्यावरून Brothers in Arms हे सुंदर गाणे झाले.



डायर स्ट्रेट्सची गाणी बघताना एक जाणवते ते म्हणजे प्रसन्न वातावरण. कदाचित प्रत्यक्षात तसं नसेलही, बँडमध्ये प्रेशर्स असतातच. पण मार्क शांत आणि सुस्वभावी वाटतो. कुठलाही आक्रस्ताळेपणा नाही, विअर्ड वागणे नाही, गिटार फोडण्यासारखे प्रकार तर नाहीच नाही. इतर गायक अल्कोहोल, कोकेन, क्रॅक यात आकंठ बुडालेले असताना, कॉन्सर्टच्या दरम्यान मार्क एखाद्या टिपिकल ब्रिटीशरप्रमाणे चहा घेत असे. १९७७ ते १९९५ अशी जवळपास २० वर्षे प्रकाशझोतात राहिल्यावर १९९५ मध्ये मार्कने कुठलाही गाजावाजा न करता डायर स्ट्रेट्स संपल्याचे जाहिर केले आणि त्याची सोलो कारकिर्द सुरू केली.

डायर स्ट्रेट्स सुरूवातीला लोकल पबमध्ये गात असत. त्यांचे नाव त्याकाळातील त्यांच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवरून घेतले आहे. त्यांचे पहिले गाणे इंग्लंडमध्ये विशेष चालले नाही. पण अमेरिकेत काही आठवड्यातच ते टॉप टेनमध्ये पोचले. एके दिवशी एक तरूण एका दुकानात गेला आणि म्हणाला, "काल रात्री मी एक गाणे ऐकले. मला गायक किंवा गाण्याचे नाव काहीच आठवत नाहिये. पण मला ते गाणे फार आवडले आहे." दुकानदाराने शांतपणे त्याला Sultans of Swing ची कॅसेट काढून दिली. डायर स्ट्रेट्स लोकप्रियतेच्या शिखरावर जाण्याची ही पहिली पायरी होती.

Tuesday, June 10, 2008

गूढ, रहस्यमय, अद्भुत : हारूकी मुराकामी


सवयी फार विचित्र असतात. जाता जात नाहीत. अशीच एक निरर्थक सवय लागलेली. कुठलेही पुस्तक वाचायला सुरुवात केली की लेखकाला कुठल्यातरी चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करायचा. आणि विशेष म्हणजे भल्या भल्या लेखकांच्या बाबतीत हे करायला जमले. डिकन्स म्हटल की दु:ख, दु:ख, दु:ख आणि मणमोहण देसाई लाजतील असे योगायोग. पण माणसाच्या मनात डोकावण्याचे कसब विलक्षण. आणि एखादे वाक्य इतके अप्रतिम की तिथे थांबून दहा मिनिटे विचार करावा लागतो. सॉमरसेट मॉमचे वैशिष्ट्य म्हणजे कथा साध्या, सरळ शब्दांमध्ये सांगितलेली. पण परत मनोव्यापारांची गुंतागुंत समोर आणायची हातोटी विलक्षण.

पण कधीकधी असे एखादे पुस्तक हाती लागते की आपले सगळे अंदाज ढासळून पडतात. (थोडक्यात मस्त स्विंगींग यॉर्करवर आपली दांडी उडते. ) असेच एक पुस्तक परवा वाचले. हारूकी मुराकामीचे 'Kafka on the shore'. पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या काही पानात एक अंदाज बांधला, तो ढासळल्यावर दुसरा, त्यानंतर तिसरा. असे चार-पाच वेळा झाल्यावर शरणागती पत्करली आणि मुकाट मुराकामी नेईल तिथे त्याच्यामागून जाऊ लागलो. यातले सर्वच विलक्षण, काहीसे फँटसीच्या अंगाने जाणारे. सुरूवातीला तर्कशुद्ध मन हे असे का, ते तसे का असे प्रश्न विचारत रहाते. नंतर गोष्टीत रंगून गेल्यावर या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत हे लक्षातही रहात नाही. मग नाकाता मांजरांशी बोलतो किंवा जळवांचा पाऊस पाडू शकतो अशा गोष्टी 'रूटीन' वाटायला लागतात.

गोष्ट सुरू होते तेव्हा जवळपास प्रत्येक प्रकरणात एखादा नवीन धागा येतो. काही काळ आपण भंजाळतो. काय चाललय काहीच कळत नाही. नंतर रूबिक क्युबचे चौरस जुळावेत तसे धागे जुळत जातात. याच्या जोडीला निवेदन इतकं प्रभावी की पुस्तक खाली ठेवायचा प्रश्नच येत नाही. फँटसी आणि रहस्य यांचा सुंदर मिलाफ. मग आधीच्या काही प्रश्नांची उत्तरेही मिळत जातात. सुप्रसिद्ध ओडीपल थीम भेटते. (यामुळेच या कादंबरीला मॉडर्न ग्रीक ट्रॅजेडी म्हटले आहे.) काही प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित रहातात. मुराकामीच्या मते प्रत्येक वाचकाची उत्तरे वेगळी असतील. पुस्तकातील विनोदही आलाच तर अगदी कळेल-न-कळेल असा. गूढतेला कुठेही तडा न जाऊ देणारा. The kind of fallen-from-grace building you find in any city, the kind Charles Dickens could spend ten pages describing. यावरून आठवले. डिकन्स किंवा इतरही काही प्रसिद्ध लेखक त्यांच्या जाडजूड पुस्तकांमध्ये पानेच्या पाने वर्णने देत बसतात. आणि खरे सांगायचे तर हे वाचायला कंटाळा येतो. बर, वाचल्याशिवाय रहावतही नाही कारण एखादे अप्रतिम वाक्य सुटायला नको. मुराकामीचे असे अजिबात नाही. शक्यतो वर्णन नाही, जिथे आहे तिथे इतके प्रभावी की वाचल्याशिवाय रहावतच नाही. मुराकामी वाचल्यानंतर इतर लेखक प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला सकाळ कशी होती, हवा कशी होती, ट्रॅफिक कसे होते, हिरो किंवा हिरूणिने काय घातले होते याचे वर्णन करण्यात पानेच्या पाने खर्च का करतात असे वाटायला लागते.

यातली सर्व पात्रे नॉर्मलच्या थोडी बाहेर जाणारी आहेत, किंबहुना ऍबनॉर्मल म्हटलं तरी चालेल. मुराकामीच्या म्हणण्याप्रमाणे त्याला 'जरा हटके' पात्रांबद्दल जास्त उत्सुकता असते. यात दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपानमध्ये घडलेल्या एका गूढ प्रसंगाचे अमेरिकन संरक्षण खात्याने नोंदलेले वर्णनही आहे, अर्थातच काल्पनिक (The Rice Bowl Hill incident). पण मुराकामी स्वतः पत्रकार आहे आणि त्याला याबद्दल अधिक विचारले असता त्याने फक्त 'नो कमेंट्स' एवढेच उत्तर दिले.

बरेचदा कलाकृतींमध्ये इतर प्रसिद्ध लेखकांचे संदर्भ आले तर लेखकाचे स्फूर्तीस्थान कळते. साइनफेल्डमध्ये वूडी ऍलनचा संदर्भ पाहिल्यावर त्याचा दर्जा फ्रेंड्सपेक्षा इतका वर का हे लक्षात येते. इथे तर नावातच काफ्का, त्यामुळे कथा अब्जर्ड असल्यास नवल नाही. (आणि काफ्का त्याचा आवडता लेखक असल्याचे मुराकामीनेही सांगितले आहे.) इतरही बरेच संदर्भ आहेत. ग्रीक ट्रॅजेडी, अरेबियन नाईट्स, मॅकबेथ, प्लेटोचे सिंपोझियम, मोझार्ट आणि शूबर्ट यांच्या संगीतातील बारकावे किंवा पुचिनीचा ला बोहेम ऑपेरा. लेखकाचा व्यासंग किती अफाट आहे याची यावरून कल्पना येते. शिवाय हेही लक्षात येते की या आणि अशा प्रकारच्या बर्‍याच लेखकांना/पुस्तकांना मुराकामी कोळून प्यायला आहे. तो जे लिहीतो आहे त्याची त्याला पूर्ण कल्पना आहे. ही सगळी नावे केवळ नेम-ड्रॉपिंगच्या उद्देशाने दिलेली नाहीत.

१९७४च्या वसंतऋतूमध्ये एका दुपारी मुराकामी एक बेसबॉल मॅच बघत असताना डेव्हिड हिल्टन खेळायला आला. ज्या क्षणाला त्याने डबल हिट मारली, त्याच क्षणाला मुराकामीला प्रकर्षाने ही जाणीव झाली की आपणही लेखक होऊ शकतो. घरी आल्यावर त्याने Hear the wind sing ही कादंबरी लिहायला घेतली. नंतर एका स्पर्धेत या कादंबरीला पारितोषिक मिळाले आणि मुराकामी लेखक झाला. मुराकामीच्या कथा जितक्या अद्भुत असतात तितकीच ही कथाही विलक्षण आहे. असे काही एखाद्या कादंबरीत वाचले तर आमच्या तथाकथित तर्कशुद्ध मनाने ते स्वीकारले असते का?

एपिलॉग : एखाद्या लेखकाचे एखादे पुस्तक चांगले असेल तर बरेचदा तो फ्लूक असू शकतो. त्याचे दुसरे पुस्तक वाचल्यावर पश्चाताप होतो असा अनुभव आहे. (उदा. उपमन्यू चॅटर्जी आणि English, August) मुराकामीचे हे पुस्तक वाचल्यानंतर लगोलग Blind Willow, Sleeping Woman मिळवले आणि ते ही वाचनीय आहे असे जाणवले. बाकी पुण्यनगरीत मुराकामीचे पुस्तक मिळवताना दमछाक झाली. नंतर नंदनकडून कळाले की मुंबईतही हीच परीस्थिती आहे.

Wednesday, June 4, 2008

The End

गिटार हे खरे तर इतर वाद्यांसारखेच एक वाद्य. तिचे सूरही अनेक गाण्यात अनेकदा ऐकलेले. मग या सुरांमध्येच असं काय वेगळेपण आहे? गाण सुरू होतं आणि आपण गारूड्याच्या पुंगीसमोरच्या नागाप्रमाणे मंत्रमुग्ध होतो. संमोहित करणारे सूर आणि गूढ शब्द. जिम मॉरिसन एक कवी म्हणूनही ओळखला जातो त्याचे कारण हेच.

This is the end, beautiful friend
This is the end, my only friend, the end
Of our elaborate plans, the end
Of everything that stands, the end
No safety or surprise, the end
I'll never look into your eyes, again

जिम मॉरिसनने हे गाणे इतर गाण्यांप्रमाणेच ड्रग्जच्या प्रभावाखाली लिहीले होते. ड्रग्जबद्दल एक समज असा आहे की याच्यामुळे आपल्या नेणिवेतील विचार प्रकट होतात. हे गाणे ऐकल्यावर हा समज खरा आहे असे वाटायला लागते.

Can you picture what will be
So limitless and free
Desperately in need
Of some strangers hand
In a desperate land



यातल्या सर्व ओळींचा अर्थ लागतोच असे नाही. स्वप्नांचा तरी कुठे अर्थ लागतो? कारण नेणिवेत असतात कुठलाही बुरखा न पांघरलेल्या सुप्त इच्छा, आकांक्षा. या जाणिवेत यायलाही घाबरतात. मग त्यांना वेगळ्या रूपात, लपूनछपून समोर यावे लागते. सभ्यता, संस्कृती या सर्वांना धाब्यावर बसवणारे हे विचार असतात.

कपोलाला हे गाणे व्हिएतनाम युद्धासाठी वापरावेसे वाटले कारण 'अपोकॅलिप्स नाऊ' चे गूढ, निर्दय सत्य या गाण्याच्या पार्श्वभूमीवर अंगावर येते. बरेचसे रॉक स्टार्स ड्रग्जच्या वापरासाठी प्रसिद्ध आहेत आणि याचे दुष्परिणामही सर्वश्रुत आहेत. प्रश्न असा की जर जिम मॉरिसन 'सोबर' असता तर हे गाणे लिहू शकला असता का?

It hurts to set you free
But you'll never follow me
The end of laughter and soft lies
The end of nights we tried to die
This is the end

Thursday, April 3, 2008

चक दे शाहरुख!

'शाहरुख खान सुरेख अभिनय करतो' हे पाच शब्द मी कधी (या क्रमाने) उच्चारेन असे वाटले नव्हते. पण वर्षानुवर्षे एखाद्याला एखाद्या कारणावरून झोडपल्यावर त्याने खरेच आपले म्हणणे खोटे ठरवले तर ते कबूल करण्याइतकी कर्टसी दाखवणे आवश्यक आहे. तेव्हा चक दे मध्ये शाहरुखने सुरेख अभिनय केला आहे.

आता यावर अर्थातच दुमत असणारच. विशेषतः आमिर क्याम्पकडून. (आणि त्यात मी ही आलोच कारण आमिर माझा लई आवडता अभिनेता आहे.) पण इतकी वर्षे चित्रपट पाहिल्यानंतर (वडीलधार्‍यांच्या भाषेत चकाट्या पिटल्यानंतर) एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे प्रत्येक चित्रपट पूर्वग्रह न ठेवता बघायला हवा. आमिर उत्कृष्ट अभिनेता असला तरी मंगल पांडे कंटाळवाणा ठरू शकतो. सलमान त्याच्या वागण्यावरून आणि चित्रपटांवरून विशेष बुद्धीमान वाटत नसला तरी केबीसीमध्ये त्याच्या सेन्स ऑफ ह्युमरची झलक बघून नवल वाटते.



शाहरुख स्वदेसमध्येही बराच बदलला होता पण यात आशुतोषचा वाटा आहे असे तेव्हा वाटले होते. आणि तो असेलच. चक दे मध्ये त्याने स्वतःची स्टाइल बदलण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे आणि एखाद दुसरे वाक्य सोडले तर तो यशस्वी झाला आहे. चित्रपटाचा विषय बघता त्याच्या स्टारडमला यात काहीही स्थान नाही. यातल्या मुलींना बरेचदा वरचढ प्रसंग आहेत आणि शाहरुखने पार्श्वभूमीत राहून त्याला योग्य साथ दिली आहे. चित्रपटाच्या काही प्रसंगांमध्ये त्याने खरोखर सुरेख अभिनय केला आहे. अशा वेळी 'किंग खान' ही उपाधी आणि त्यासोबत येणारे सर्व गारबेज जाऊन आपल्याला एक वेगळा कलाकार बघायला मिळतो. असे प्रसंग बघताना अतिप्रसिद्धी मिळणे हे कलाकारांना कधीकधी मारक ठरते की काय असे वाटून जाते. याचे दुसरे उदाहरण म्हणजे अमिताभ आणि त्याची अँग्री यंग मॅन इमेज. अमिताभने मनमोहन देसाईंबरोबर इतके भयाण चित्रपट का केले याचे उत्तर या जन्मात मिळेल असे वाटत नाही. (तसेच शाहरुखला वाया घालवण्यात करण जोहरचा कोल्ह्याचा वाटा आहे.) शाहरुखला सर्व मुलींनी उत्तम साथ दिली आहे. विशेषतः बिंदियाच्या भूमिकेत शिल्पा शुक्ला आणि प्रितीच्या भूमिकेत सागरिका घाटगे सुरेखच. दिग्दर्शक शिमित अमिनचा अब तक छप्पन नंतर हा दुसरा चित्रपट. पण संकलन आणि ध्वनी विभागात बर्‍याच विदेशी चित्रपटांचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. (त्यातला एक मार्टिन स्कोरसेझीबरोबर.) कदाचित याचाच परिणाम म्हणून चित्रपटातील गाणी पाश्चात्य चित्रपटांप्रमाणे पार्श्वभूमीत, आणि बरेचदा अर्धवटच वाजतात. यामुळे कुठेही कंटिन्यूटी तुटल्यासारखे वाटत नाही. अन्यथा कथा सुंदर चाललेली असताना पात्रे सर्व सोडून अचानक पार्कात ४०-५० कातकर्‍यांबरोबर कवायती करायला लागतात! शिवाय कुठेही फिल्मीपणा न येऊ देता आणि नेहेमीचे प्रसंग टाळून त्याने एक सुखद धक्का दिला आहे. यातील व्यक्तिरेखा ब्लॅक किंवा व्हाइट न दाखवता ग्रे दाखवल्या आहेत हे आणखी एक विशेष. सलीम आणि सुलेमान मर्चंट यांचे संगीत श्रवणीय आहे. ('चक दे' आणि 'मौला मेरे' अप्रतिम!)

सगळ्यांवर साता-जन्मांची दुश्मनी असल्यासारखा खेकसणारा बॉस डिसूझाला पैशाची अडचण आहे असे कळाल्यावर आपणहून मदत करतो. सदैव सुतक असल्याचा चेहेरा ठेवणारा जोश्या गॅदरिंगमध्ये गिटारवर 'चांद मेरा दिल' गाऊन सगळ्यांना चकित करतो. यांचा अर्थ काय? खोलात न शिरता इतकेच म्हणता येईल की माणूस अनप्रेडिक्टेबल असतो. आणि म्हणूनच कुणालाही कसलेही लेबल चिकटवू नये. ते कधी न कधी खोटे ठरते आणि मग तुम्हाला तुमचे शब्द गिळावे लागतात. प्रत्येक दिवस जसा नवीन असतो, तसाच त्या दिवशी भेटणारा प्रत्येक माणूसही नवीनच असतो. भले तुमची त्याची वर्षांची ओळख असेल, पण काल आणि आजच्या चोवीस तासांमध्ये त्याने जे अनुभव घेतलेले असतात, त्याने ज्या संवेदना अनुभवलेल्या असतात, त्यामुळे तो किंचित बदललेला असतो. असा रोज थोडाथोडा होणारा बदल लक्षात आला नाही तर एखादे दिवशी तो त्याच्या लेबलच्या संपूर्ण विरुद्ध वागून आपल्याला चकित करतो आणि मग आपण म्हणतो, "अरेच्या, इतकी वर्षे ह्याला ओळखतो, पण ही बाजू कधी बघायला मिळाली नव्हती."

चक दे मध्ये शाहरुखला बघताना असेच वाटले.

Monday, March 31, 2008

मराठी (सिंधी, मारवाडी, गुजराथी) पाउल पडते पुढे

बिगरमराठी नागरिकांसाठी मराठीचे वर्ग..चुकलो क्लासेस सुरू होणार असल्याची बातमी वाचली आणि मागच्या ब्याकग्राउंडमध्ये दुंदुभी वाजायला लागल्या. लगेच आम्ही पुढे सरसावलो आणि शुभारंभासाठी विद्यार्थ्यांची यादी तयार केली.

१. मुकेश अंबानी
२. अनिलभैय्या आणि टिनावहीनी (आमच्या मामाच्या क्लासला यायचं हं!)
३. रतन टाटा
४. परमेश्वर गोदरेज
५. शाहरुख खान (ओम शांती ओम बद्दलचा माफक सूड!)
६. सलमान खान ('रामा इकडे ये' गिरवायला लागला तर टिनपाट चित्रपट तरी कमी होतील)
७. मराठी वाहिन्यांवरचे सर्व निवेदक आणि निवेदिका. They need it the most, you know!
८. रा. रा. दाउदभाय : आता (बहुधा) दुबईत असले म्हणून काय झाले, शेवटी ते मुंबईचेच ना!
९. आता दाउदभाय आहेत म्हटल्यावर पक्या डेंजर, कल्लू टेंशन वगैरे येणारच ना!
१०. दिवसभर मरेस्तोवर काम करून दोन वेळचे जेवण मिळवणारे हमाल, फेरीवाले वगैरे.

लगेच नेत्रांसमोर दृश्ये तरळू लागली.

रिलायन्सची मोक्याची बैठक.

"ते आले ना, ते आले ना. अनिल डार्लिंग, तुमच्याआधी मी त्यांना पाहिलं. मुकेशभावोजी, तुमच्या आधी मी त्यांना पाहिलं." टिनाला मराठी ड्रामाजमध्ये डिस्टींक्शन आहे.
"सूं थयुं? क्या बात कर रही है? कौन आया?" अनिल.
"अहो, तुमच्या आणि भावोजींच्या समभागांची कागदपत्रे घेऊन वकील लोक आले."
"लुक अनिल. तेरेको चाहिये तो पूरा रिलायन्स ले ले. लेकिन इसका लँग्वेज सुधार यार. साला सुबह से दिमाग का दही बना दिया" मुकेश.

बापरे! अंबानी कुटुंबात मराठीवरून समझोता?
* * *
"देख, आज लफडा नही मंगता है. आज गेम हो जाना चाहिये." दुबईवरून भाईचा दूरध्वनी.
"तथागत, आपल्या सूचनेप्रमाणे सर्व कार्यवाही झालेली आहे. श्री. कल्लू टेंशन यांचा आज सायंकाळी कुलाबास्थित लोखंडवाला इमारतीबाहेर वध करण्यात येईल." पक्या डेंजरला हल्लीच प्राचीन मराठीची गोडी लागली होती. ह्या वर्गाची शिक्षिका कमळी होती ही बात अलाहिदा.
"देख पक्या, तेरेको आखरी टाईम बोलता है. ये तेरा मराठी का नाटक बंद कर. अपना खोपडी सुबासे वैसेईच गरम है."
"तथागत, आपण कृपया क्रोधित होऊ नये. त्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयालाही धोका असतो."
"अबे *?#§* सुन, वो पप्पू वहां है ना. उसको फोन दे."
"हां, पप्पू, सुन, वो कल्लू को छोड. सबसे पहले इस पक्या का गेम बजा दे. साला दिमाग का भाजीपाला होरेला है."

बिचारा पक्या. फुकट जीव जाणार त्याचा.
* * *
Hi Guys! तुमच्या life मध्येही somebody special यायला हवं असं वाटत ना? कुणी असं की ज्याच्या memories तुमचे days, तुमच्या nights shine करून टाकतील? मग या व्हॅलेंटाइन dayला your own RJ मेधा will be with you and she will help you to find that special someone. The Brad Pitt or the Angelina Jolie of your life who will make you smile and make every day of your life a Valentine's Day. Stay tuned to Radio Dhaniya!

हुश्श. इथे मात्र काही बदललेलं नाहिये हे पाहून बरं वाटलं. You have to have some constancy in life, you know!

Wednesday, March 19, 2008

मैने गीतों को रच कर के भी देख लिया...

खेळ सुरू केल्याबद्दल मेघनाचे आणि खो दिल्याबद्दल ट्युलिपचे आभार.

लिहीणे कधीकधी कॅथार्टिक असते असे म्हणतात. सॉमरसेट मॉमने Of Human Bondage च्या प्रस्तावनेत म्हटलय, "या पुस्तकाने माझ्यासाठी जे करायला हवे होते ते केले. हे पुस्तक जेव्हा जगासमोर आले (तो युद्धाचा काळ होता आणि जगाला एका काल्पनिक पात्राकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:च्या समस्या आणि क्लेश अधिक महत्त्वाचे वाटले असतील) तेव्हा माझी माझ्या दु:खापासून आणि त्रासदायक कटू आठवणींपासून मुक्तता झाली." मॉमच्या तुलनेत आपण मर्त्य माणसे. पण लिहील्यानंतर हलके वाटले तर त्यामागे कॅथार्टिक प्रक्रिया असावी का?

अशीच एक शनिवार संध्याकाळ. आठवड्याच्या बाजारात मांडलेले चीज, वाईन, हॅम, मधाच्या बाटल्या. कोपर्‍यावरच्या कॅफेबाहेर व्हाईट वाईनचा आस्वाद घेत, उन खात बसलेले इटालियन आजोबा. एक धावणारा, एक रडणारा आणि कुशीत झोपलेला या सर्वांना सांभाळत वाईनची खरेदी करणारी मरिया. छोट्या अँम्ब्युलन्सजवळ खाट टाकून लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणारा फिलिपो. अचानक सर्व पॉझमध्ये जातात आणि एम्पीथ्री प्लेअरवर गाणे सुरू होते

कहूं किससे मै के क्या है, शब-ए-गम बुरी बला है
मुझे क्या बुरा था मरना, अगर एक बार होता

दोनशे वर्षांपूर्वीच्या एका मनस्वी कवीचे शब्द, एका पूर्णपणे वेगळ्याच वातावरणात ऐकताना बर्गमनच्या चित्रपटांसारखे सगळे 'सरिअल' वाटायला लागते. ग़ालिबची तीव्र वेदना देश, काल, भाषा, संस्कृती सर्वांची अंतरे ओलांडून मनाला भिडते. अशा ओळी वाचल्या की शब्दांमागे असलेले प्रचंड सामर्थ्य लक्षात येते. मग वाटतं, आपण शब्द किती निष्काळजीपणे वापरतो. आपल्या भावना, विचार, मनातली घालमेल, अपयशाचे दु:ख, अपेक्षाभंगाची वेदना हे सगळं व्यक्त करण्यासाठी शब्दांइतके चांगले माध्यम कुठे सापडणार?

लिहीण्याचा संबंध कुठेतरी अनुभूतीशी असावा. पण हे जाणिवेत आणायचे म्हटले तर अशक्य वाटते. रोज आपण किती अनुभवांमधून जात असतो. त्यातले काही मनावर कळेल न कळेल असा ठसा उमटवून जातात. बहुतेक वेळा हा परिणाम इतका सूक्ष्म असतो की नेमका काय परिणाम झालाय हे कळतही नाही. मग जुने लिखाण वाचताना कधीकधी एखादा शब्द, एखादे वाक्य यांची आणि त्या अनुभूतीची संगती लागते आणि हा सबंध लक्षात येतो. आणि हे व्यक्त होण्याची प्रक्रियाही भन्नाट असते. बरेचदा एखाद्या कवितेतून वेगळाच प्रसंग चित्रीत होतो पण थोडे खोदून बघितले तर त्यामागची खरी प्रेरणा लक्षात येते.

अनुभूतींचे जग तरी किती विलक्षण!. रात्रीच्या दोन वाजता शांततेत गाणार्‍या मार्क नॉफलरचा ’ग्रफ’ आवाज, एप्रिलमधल्या सुरेख सकाळी इटलीच्या रस्त्यांवरून भटकताना वार्‍याच्या मंद झुळूकीमुळे क्षणभरच जाणवलेला एका सुवर्णकेशीच्या शनेलचा गंध, उत्साह आणि चैतन्य यांनी भरभरून वाहणारा झाकिरभाईंचा परफॉर्मन्स, सिस्टीन चॅपेल प्रत्यक्ष बघताना मायकेल अँजेलोच्या दिव्यत्वाची पटलेली साक्ष, एखाद्या निष्णात सर्जनने सफाईने सुरी चालवावी तसा सचिनने मॅकग्राला मारलेला पुल शॉट , गॉडफादरमध्ये सोलाझ्झोचा खून करण्याच्या काही क्षण आधी केवळ डोळ्यांमधून पानभर डायलॉक बोलणार्‍या पचिनोच्या अभिनयाचा अविस्मरणीय आविष्कार. हे सगळे अनुभव मनात रूजत रहातात. पण सकाळी अनुभव घेतला की दुपारी लगेच लिहायला बसू असेही होत नाही. बरेचदा अनुभव अंतर्मनात मुरून एका वेगळ्याच रूपात बाहेर पडतो. हे रूप कुठले असेल ते आधी कळणे अशक्य. मग काहीतरी वेगळेच लिहीताना अचानक तो क्षण समोर येतो आणि आपली छोटीशी खूण ठेवून जातो. एखाद्या गोष्टीला आपला खास असा 'ट्च' देऊन जातो. याच्या उलट प्रवासही काही वेळेस होतो. एखाद्या कवीची एखादी ओळ वाचताना विसरून गेलेला लहानपणीचा एखादा क्षण लख्ख आठवतो. तो क्षण, ती भावना यांचे वर्णन करता येणे अशक्य.

दोन एक वर्षांपूर्वी मनोगतावर एक ’टू डू लिस्ट’ केली होती , उरलेल्या आयुष्यात काय काय करायला आवडेल त्याची. त्यात एक आयटेम होता - एक पुस्तक लिहायचे आहे. लिस्टमधले अजून तरी काही बदलावेसे वाटलेले नाही.

एवढं सगळं लिहील्यानंतर मूळ प्रश्नाचे उत्तर मिळाले की नाही ठाउक नाही. पण मला वाटते उत्तर मिळण्यापेक्षा ते शोधण्यातच जास्त मजा आहे.

माझा खो a sane man ला. :-)

Sunday, March 9, 2008

वादळ

आकाशात विजांचा कडकडाट
तिचा क्रोधित कटाक्ष
आज तिचा वाढदिवस...विसरलो

ढगांचा गडगडाट
ती मात्र गप्प
शांतताच सगळं बोलून जाणारी

बाहेर संततधार
पाहून तिचे अश्रू
माझेही डोळे ओले

घोंघावणारा वारा
समजूत काढताना
तिचा बदलणारा चेहरा

पाउस मंदावला, खिडकीवर थेंबांची टपटप
बट मागे सारत
ती माझ्याकडे बघते

शांत निसर्ग, सूर्य डोकावतो
माझ्या गालावर ओठ टेकवत
अखेर ती हसते

वि.सू. सध्याच्या 'चोरी चोरी चुपके चुपके' च्या काळात एक गोष्ट स्पष्ट कराविशी वाटते. ही कविता निर्झर या टोपणनावाने मी मनोगतावर आधी प्रकाशित केली आहे.
 
www.blogvani.com Visit blogadda.com to discover Indian blogs